सोलापूर : नववर्षांच्या पहिल्याच दिवशी किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून सहा जणांनी वैभव वाघे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सौमा विलास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयितांना ताबडतोब जेरबंद केले, पण आता जखमी वैभवचा मृत्यू झाल्याने संशयितांविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.
मद्यपान केलेल्या सनी निकंबे याच्यासोबत १ जानेवारीला झालेल्या किरकोळ वादातून २०२३ मध्ये जयंतीवेळी शिरसे व शिवशरण कुटुंबासोबत झालेल्या भांडणाचा रागही त्यावेळी संशयित आरोपींनी काढला. सुरवातीला भांडणात दोघे जखमी झाले. त्यातील एकाला त्याच्या पत्नीने उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. तर आदित्य धावणे घरात जाऊन बसला. त्यावेळी त्याने वैभव श्रावण वाघे याला गल्लीत भांडण लागले असून पोलिसांना बोलविण्यासाठी फोन केला होता.
त्याने ‘डायल ११२’ वर कॉल करून पोलिसांना भांडणाची माहिती दिली आणि त्यानंतर तो दुचाकीवरून त्याठिकाणी गेला. पण, तेथे संशयित आरोपीशिवाय कोणीच नव्हते. संशयित आरोपींना पाहून वैभव दुचाकी वळवून पळून जाऊ लागला. त्यावेळी संशयितांनी त्याचा पाठलाग केला तर एकजण समोर आला आणि त्याने दुचाकीवरून वैभवला खाली पाडले.
त्यावेळी संशयितांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉड व लाकडी
दांडक्याने वैभवच्या डोक्यात जबर मारहाण केली. पोलिस घटनास्थळी पोचले, त्यावेळी वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविले, पण सहा दिवसानंतरही तो शुद्धीवर आला नाही आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया देखील झाली होती, पण त्याचा मृत्यूशी संघर्ष संपला आणि त्याने अखेरचा श्वास घेतल्याचे सदर बझार पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.