धाराशिव : प्रतिनिधी
शहरातील अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रोहितराज दंडनाईक यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी शनिवारी दि. २ डिसेंबर रोजी काही अटीवर जामीन मंजूर केला आहे. पतसंस्थेचे संचालक संजय बोंदर यांनीही अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला असून या अर्जावर सोमवारी दि. ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपल्यानंतरही परत मिळत नसल्याने अरविंद पतसंस्थेचे ठेवीदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचे चेअरमन रोहितराज दंडनाईक, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्यावर १ सप्टेंबर २०२३ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अरविंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात १० लाख रूपयांचा गुन्हा नोंद आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम रोहितराज दंडनाईक यांनी न्यायालयात जमा केली आहे.
पोलीसांच्या तपासात हा आकडा साडेतीन कोटीच्या पुढे गेला आहे. शनिवारी दि. २ डिसेंबर रोजी न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी चेअरमन रोहितराज दंडनाईक यांचा जामीन काही अटीवर मंजूर केला आहे. त्यामुळे श्री. दंडनाईक यांना दिलासा मिळाला आहे. सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता अॅड. शरद जाधवर यांनी तर श्री. दंडनाईक यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. मिलिंद पाटील यांनी बाजू मांडली.