17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरपाणी न सोडल्यास पोखरापूर तलावातच बेमुदत धरणे आंदोलन

पाणी न सोडल्यास पोखरापूर तलावातच बेमुदत धरणे आंदोलन

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी पोखरापूर येथील टप्पा क्रमांक २ या योजनेत त्वरित सोडून या भागातील शेतक-यांना न्याय देण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे पाणी नाही सोडल्यास पोखरापूर तलावातच बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

उजनी कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोखरापूरसह खवणी,सारोळे या गावातील शेतकरी आणि जनतेच्या जीवनात हरितक्रांती घडविणा-या पोखरापूर टप्पा क्रमांक २ या योजनेच्या मागे गेल्या पंचविस वर्षांपासून साडेसाती लागली होती. मात्र आता या योजनेसाठी आवश्यक असणा-या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यातच गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला आसल्याने जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जानेवारी उजाडला तरी धरण ११० टीएमसीच्या वर भरलेले आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच सद्या उजनी धरणातून डावा आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

आष्टी उपसा सिंचन योजनेतून पोखरापूर टप्पा क्रमांक २ या योजनेत पाणी सोडल्यास त्याचा पोखरापूरसह खवणी, सारोळे या गावांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणा-या आणि पाण्यासाठी वनवास भोगणा-या या गावातील शेतक-यांना आणि जनतेला न्याय देण्यासाठी या योजनेत पाणी सोडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या योजनेत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर संबधीत विभागाच्या अधिका-यांनी देशमुख यांना पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अधिका-यांनी हे आश्वासन पाळले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या योजनेत पाणी नाही सोडल्यास या तलावातच बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

या निवेदनावर सारोळेचे सरपंच शाहीर सलगर, जनहित शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पंजाबराव करंडे, जिल्हाध्यक्ष नाना मोरे, माजी सरपंच कामराज चव्हाण, किरण वाघमारे, गुंडीबा राऊत, लक्ष्मण वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR