17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयहरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना जामीन मंजूर

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण हस्तांतरित

नवी दिल्ली : खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना कॅनडातील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग या चार आरोपी भारतीय नागरिकांवर फर्स्ट डिग्री खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

खटला ब्रिटीश कोलंबिया सुप्रीम कोर्टात चालवण्यात येत आहे. पुढील सुनावणी ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. खलिस्तान समर्थक प्रमुख हरदीप निज्जर यांची जून २०२३ मध्ये सरे, ब्रिटिश कोलंबिया येथे हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला. भारताने हे आरोप फेटाळून लावत त्यांना ‘निराधार’ म्हटले. चार भारतीय नागरिकांना रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी मे २०२४ मध्ये कॅनडाच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली होती. प्राथमिक सुनावणी दरम्यान फिर्यादीने पुरावे सादर करण्यास विलंब केल्याने टीका झाली. इंडिया टुडेने तपासलेल्या न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की चारही जणांना खटल्याच्या प्रतीक्षेत असताना स्टे ऑफ प्रोसिडिंग अंतर्गत सोडण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात हजर झाले.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित
न्यायालयाच्या नोंदीनुसार, चारही प्रतिवादींची स्थिती ‘एन’ म्हणून चिन्हांकित केली गेली, जे ते कोठडीत ‘‘नाही’’ असल्याचे दर्शविते. याचा अर्थ व्यक्तींना सध्या ताब्यात घेण्यात आलेले नाही आणि पुढील न्यायालयीन कार्यवाहीच्या प्रतीक्षेत असताना त्यांना जामिनावर किंवा विशिष्ट परिस्थितीत सोडण्यात आले आहे. कॅनडाच्या सरकारने सरे प्रांतीय न्यायालयाकडून ब्रिटीश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयात प्रकरण हस्तांतरित केले आहे.

हरदीप सिंग निज्जर कोण होता?
निज्जर कॅनडाच्या सरे शहरात राहत होता. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम कॅनेडियन प्रांतातील हे सर्वांत मोठे शहर आहे. १९९७ साली त्याने पंजाबहून कॅनडात बस्तान हलवले. सुरुवातीला कॅनडामध्ये प्लम्बरचे काम केल्यानंतर निज्जर कॅनडामध्येच लग्न करून स्थायिक झाला, त्याला दोन मुले आहेत. २०२० सालापासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता. निज्जरचे मूळ पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भर सिंग पुरा या गावात आहे. करोना महामारीच्या पहिल्या लाटेपूर्वी निज्जरचे पालक या गावात येऊन गेले होते, अशी माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR