रेणापूर : प्रतिनिधी
गेल्या नऊ दिवसांपासून रेणापूर येथील आधारभूत खरेदी केंद्र बारदनाअभावी बंद असल्यामुळे शेतक-यांच्या हजारो क्वींटल सोयाबीनची खरेदी ठप्प झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन बाजारात व्यापारी शेतक-यांची अक्षरश: लूट करीत आहेत. बाजारात ३ हजार ७०० रुपयांच्या वर सोयाबीन विकले जात नाही. दुसरीकडे बारदाना उपलब्ध नसल्याने शेतक-यांच्या सोयाबीनचे माप होत नाही. अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. बारदाना कधी येईल ? नोंदणी केलेल्या सोयाबीनचे माप कधी होईल? अशी विचारणा शेतकरी करीत आहेत.
शासनाने ८ जानेवारीपर्यंत सोयाबीन नोंदणीची मुदत वाढवून दिली होती ती संपली आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केली जात नाही. एकीकडे हमीभावाने सोयाबीनची खरेदी करणार म्हणून घोषणा करायची आणि दुसरीकडे बारदान्याच्या तुटवडा निर्माण करून शेतक-यांची कोंडी करायची असा राज्य शासनाचा दुटप्पीपणा यातून उघड होत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. बाजारात ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलने विकत असलेले सोयाबीन साडेतीन ते ३ हजार सातशे रुपयांवर आल्याने शेतक-यांची मोठी आर्थिक गोची होत आहे. पाचशे ते सहाशे रुपयांनी सोयाबीनचे भाव घसरले आहेत. रेणापूर तालुक्यात एकमेव असलेल्या शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रांवर सोयाबीनला नाही. वेगवेगळे निकष लावून सोयाबीनची खरेदी केली जात होती आता १० दिवसांपासून तीही बंद आहे. बारदानाच उपलब्ध नाही हे कारण शेतक-यांना सांगितले जात आहे.
रेणापूर तालुक्यात श्री रेणुका खरेदी विक्री संघाचे एकमेव आधारभूत खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर अडीच- तीन महिन्यांत केवळ ८ हजार २२६ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. तर ४ हजार १०० शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने सोयाबीनला प्रतिक्वींटल ६ हजार रुपये भाव देण्याचे जाहीर केले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. किमान बाजारातील दरावर तरी शासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येत आहे. नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन कधी विकेल याची प्रतीक्षा करत आहेत. ज्यांचा नंबर आला आहे अशा शेतक-यांना मॅसेज पाठविण्यात आले आहेत परंतु बारदाना उपलब्ध नसल्याने त्यांच्या सोयाबीनचे माप होत नाही.