नवी दिल्ली : म्यानमार देशातून एक धक्कादायक घटना बातमी आली आहे. म्यानमारमधील पश्चिम राखीन राज्यातील अल्पसंख्याक वांशिक गट अराकान आर्मीच्या नियंत्रणाखाली असलेल्या रामरी बेटावरील क्युक नी माव गावात लष्कराने हवाई हल्ले केले. यात किमान ४० लोक ठार, तर सुमारे २० जखमी झाले आहेत. स्थानिक सेवाभावी संस्थेच्या अधिका-यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. हवाई हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत शेकडो घरेही जळून खाक झाल्याचा दावाही अधिका-यांनी केला आहे.
दरम्यान, लष्कराने या भागात कोणत्याही हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. गावातील परिस्थितीची स्वतंत्रपणे पुष्टी करता येत नाही, कारण परिसरात इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा जवळजवळ विस्कळीत झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने आंग सान स्यू की यांच्या निवडलेल्या सरकारची हकालपट्टी केली, तेव्हापासून म्यानमारमध्ये हिंसाचार सुरू झाला. शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी लष्करानेही बळाचा वापर केला. यानंतर लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे हाती घेतली आहेत आणि देशाचा मोठा भाग आता संघर्षाच्या भोव-यात सापडला आहे.