मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आज कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केली. त्यावरून पक्षात दोन गट असल्याचे समोर आले. नव्या पिढीने लोकांना सहज भेटणारा मराठेतर नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवा, अशी मागणी लावून धरली. त्यावर खुद्द जयंत पाटील यांनी कोणी बुथवर किती काम केले, याचा रिपोर्ट ८ दिवसांत द्या, मी राजीनामा देतो, असे प्रतिआव्हान दिले. त्यामुळे बैठकीत पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत दोन दिवसाची बैठक आयोजित करण्यात आली. या आढावा बैठकीच्या पहिल्या दिवसी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देतात, यामुळे कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होतो, अशी नाराजी व्यक्त केली तर आज काही कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्षांसह सर्व फ्रंटचे पदाधिकारी बदलण्यात यावेत, राज्यांमध्ये वेगळे वातावरण असल्याने मराठा व्यतिरिक्त समाजातील लोकांना संधी द्यावी, अशी थेट मागणी शरद पवार यांच्यासमोर करण्यात आली. एका कार्यकर्त्याने शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. तेव्हा जयंत पाटीलही व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळायला हवा. संघटनात्मक बदल पक्षासाठी गरजेचे आहेत. नवा प्रदेशाध्यक्ष मराठेतर असावा. त्याचा पक्षाला फायदा होईल. नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला वेळ देणारा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विधानसभेला गाफील राहिलो, ती चूक नको
या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी लोकसभेतील घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले हिंदुत्वाचा प्रचार केला. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे सांगताना आता गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी केले.
६० टक्के तरुणांना उमेदवारी देणार
स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत महिलांना ५० टक्के तर खुल्या गटात तर ६० टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाईल. ३५ वर्षांवरील कार्यकर्त्यांनी आता राज्य पातळीवर काम करण्याचे आवाहन पवारांनी आढावा बैठकीत केले.
८ दिवसांत राजीनामा देतो
पक्ष चालवणे हे काही सोपे काम नाही. जोरदार भाषण करून उपयोग नसतो. डोके शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचे असते. प्रत्येकाने पुढील २ दिवसांत आपण आपल्या वॉर्डात पक्षाला किती मत मिळवून दिली ते सांगा. त्यानंतर आठ दिवसात राजीनामा देतो, असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले. तसेच यश-अपयशाला एकटे प्रदेशाध्यक्ष जबाबदार नसतात. त्यामुळे या मुद्यावरून प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागणे गैर आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.