मुंबई : नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यातील नेतृत्वक्षमता प्रभावित करणारी असून तो लवकरच रोहित शर्माच्या जागी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करील, असा विश्वास दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौ-यात ३२ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत विदेशी गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
बुमराहच्या नेतृत्वात पर्थमध्ये झालेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकला होता. चॅनेल सेव्हनशी संवाद साधताना गावसकर म्हणाले बुमराह भारतीय संघाचा पुढील कर्णधार असू शकेल. तो जबाबदारीने पुढे येत नेतृत्व करतो. त्याची वागणूक फार चांगली असून अनावश्यकदृष्ट्या कुणावरही दडपण आणण्याचा त्याचा स्वभाव नाही. नेतृत्वाचे सर्वच गुण त्याच्यात आहेत.
अनेकदा कर्णधारावर अनावश्यक दडपण येते. बुमराह मात्र असा विचार करतो की, तुम्हाला दिलेली जी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा; पण त्यासाठी कुणावरही दडपण आणत नाही. बुमराह मागच्या काही वर्षांपासून भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करीत आहे. त्याच्या मार्गदर्शनात मोहम्मद सिराजला वेगवान गोलंदाज म्हणून विकसित होण्यास मदत झाली. तो मिड ऑफ आणि मिड ऑनला उभे राहून वेगवान गोलंदाजांना टिप्स देतो. त्याची उपस्थिती फारच लाभदायी ठरते. गोलंदाजांशी हितगुज साधण्यास तो कधीही उपलब्ध असतो. बुमराह कर्णधार बनल्यास मला आश्चर्य वाटणार नाही असे गावसकर म्हणाले.
सिडनी मैदानावर झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जखमी झाल्यामुळे बुमराह दुस-या डावात गोलंदाजीला आला नव्हता. त्याआधी त्याने १३.०६च्या सरासरीने आणि २८.३७ च्या स्ट्राइक रेटने गडी बाद केले. या सामन्यात नेतृत्व करणा-या बुमराहच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाने १६२ धावांचे विजयी लक्ष्य सहज गाठले होते.