पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर, येत्या काही महिन्यांत येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ही महायुती पाहायला मिळेल असं, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र पुण्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असणा-या भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातून भाजपात आलेल्या पाच माजी नगरसेवकांच्या प्रवेशापासून, भाजप आणि शिवसेनेत अजूनच बिनसल्याचे दिसत आहे. सुरवातीला धनुष्यबाण चिन्हावर लढवलेल्या सर्व जागांवर शिवसेनेने दावा केला. तर शहरात महापालिका निवडणुकीसाठी ५५ ते ६० जागांवर देखील दावा केला. हा वाद संपतो न संपतो तोच नव्याने भाजपात आलेल्या या नगरसेवकांनी खरी शिवसेना हे ठाकरेंचीच असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या सगळ्या वादाची पार्श्वभूमी पाहता शिवसेना आणि भाजपच्या पुण्यातील नेत्यांची मने ही, टोकाची दुभंगली गेली आहेत.
नुकतेच पुण्यातील महायुतीतील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा आणि श्रमपरिहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महायुतीतील सर्वच पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि आमदार हे उपस्थित राहिले होते. मात्र शिवसेनेचा एकही पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक इतकेच नाही, तर स्वत: शहराध्यक्ष देखील या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने भाजप-सेनेच्या या वादावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शहरात महायुती फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. आता या वादाचा दुसरा अंक महापालिका निवडणुकांपूर्वी प्रत्येक शहरात पाहायला मिळत आहे आणि त्याचीच प्रचिती पुणे शहरात भाजप आणि शिवसेनेते सुरू झालेल्या टोकाच्या वादात येत आहे.