धाराशिव : धाराशिव इथे बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे ड्रग्स तस्करांबरोबरचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली.
आमदार धस यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. आमदार धस यांच्या या गौप्यस्फोटावर मंत्री धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या सभेतील भाषणा दरम्यान, एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण दाखवले. पाकिस्तानातून तस्करी झालेल्या ड्रग्जवर गुजरातमध्ये झालेल्या कारवाईची आठ महिन्यांपूर्वीचा बातमी असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुजरातमध्ये तीन दिवसांत ८९० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत महाराष्ट्रातील तिघांसह पाच जणांना अटक केली, केलेली ही बातमी आहे.
या बातमीचा संदर्भ देताना भाजप आमदार धस यांनी, या ड्रग्स तस्करीच्या कारवाईत अटक करण्यात आलेला कैलास सानप आणि दत्ता आंधळे कोण आहेत? हे दोघे गेल्या दीड ते एक वर्षांपासून ड्रग्स तस्करीत अटकेत आहेत. यांचे फोटो कोणाबरोबर आहे, तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर. आका… मेन आका… हा फोटो बघा, असे सांगून हा जाहीर सभेत फोटो दाखवले. हा फोटो देखील व्हॉट्सअप टाकतो. करा खुलासे. द्या आम्हाला शिव्या. धमक्या देत आहेत. अंजली दमानिया यांना धमक्या देत आहेत. मला देखील धमक्यांचा मेसेज आला, असे सांगून खळबळ उडवून दिली.
या ड्रग्स तस्करांच्या फोटोंच्या आरोपापूर्वी आमदार सुरेश धस यांनी, बीडमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या खर्चांवरून आरोप केले. वाल्मिक कराड याने याचे टेंडर परभणीतील एकाला दिले होते. त्या दोघांचे फोटो देखील सुरेश धस यांनी दाखवले. या सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च झाला १० लाख रुपये. जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यावर बिल काढले पाच कोटी रुपये, असा आरोप देखील आमदार धस यांनी केला.