नाशिक : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका, बदललेले हवामान, कंटेनरचे वाढलेले भाडे, अशा अनेक समस्यांवर मात करत नाशिक जिल्ह्यातील (ठं२ँ्र‘ ऊ्र२३१्रू३) द्राक्ष निर्यातदारांनी चालू हंगामात ६ जानेवारीअखेर ३६२ कंटेनर अर्ली द्राक्ष विदेशात पाठविले असून, याद्वारे ५६८५.७९ मेट्रिक टन माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. यात युरोपीय देशात ६३.४४० तर युरोप खंडाबाहेरील देशात तब्बल ५८५.७९ टन द्राक्ष रवाना करण्यात आली.
द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख जगभरात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकसह भारतातील द्राक्ष निर्यातदारांसमोर संकट उभे ठाकले होते. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गेच लांबचा पल्ला गाठून सुरू आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे. मात्र, यावरही द्राक्ष निर्यातदारांनी मात केली आहे. अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत.
१ लाख ६० हजार टनाचे उद्दिष्ट
डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांसमोर आव्हान उभे होते. तरी यंदाही विदेशातील द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाने सुमारे एक लाख ६० हजार टनांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ५६८५.७९ टन द्राक्षमाल विदेशात पोहोचला आहे. द्राक्षाचा मुख्य हंगाम हा डिसेंबर ते एप्रिलदरम्यान असल्याने या कालावधीत द्राक्ष निर्यातीस बूस्ट मिळणार आहे. या हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून साधारण १६ हजाराहून जास्त शेतक-यांनी २० हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे.