लातूर : प्रतिनिधी
खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळले आहेत. याच परिस्थितीत शेतक-यांची गर्दी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे वळली आहे. बारदानाअभावी सोयाबीन खरेदी बंद होती. शेतक-यांसमोर मोठी अडचण होती. ही अडचण लक्षात घेता लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लातूरला बारदाना उपलब्ध करुन द्यावा, ठप्प झालेली सोयाबीन खरेदी पूर्ववत सुर करावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत शासनाने लातूरला बारदाना उपलब्ध करुन दिला आणि मार्केटिंग फेडरेशनच्या लातूर जिल्ह्यातील १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली.
खुल्या बाजारात सोयाबीनला ३८०० ते ४२०० रुपयांपर्यंतचा दर आ.े मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर सोयाबीला ४८९२ रुपये क्विंटलला दर मिळत आहे. यामुळे सोयाबीनच्या हमी केंद्रांवर शेतक-यांनी गर्दी केली होती. मार्केटिंग फेडरेशनच्या लातूर जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर जिल्ह्यातील ४३ हजार ८०३ शेतक-यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. सोयाबीन खरेदी झाल्यापासून आजपर्यंत या १६ केंद्रांवर १ लाख ७६ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे. खुल्या बाजारात सोयाबीनला दर मिळत नसल्याने नाफेडच्या केंद्रांकडे शेतक-यांचा कल वाढलेला असताना बारदानाअभावी या केंद्रांवरील सोयाबीन खरेदी बंद झाली होती.
सोयाबीन खरेदी बंद असल्याने माल वाहतूक करणा-या वाहनांचे अतिरिक्त भाडे शेतक-यांना भरावे लागत आहे. अनेक शेतक-यांना आर्थिक, मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे शासनाने यात हस्तक्षेप करून तातडीने बारदाणा उपलब्ध करुन द्यावा अथवा शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या बारदाण्याला मंजुरी देऊन सोयाबीनची तात्काळ खरेदी सुरु करावी तसेच नोंदणीसाठी व खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, याही मागण्या श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केल्या होत्या. सरकारने या सर्व मागण्यांची तत्काळ दखल घेत बारदाना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
लातूर जिल्ह्यातील १६ नाफेड केंद्रावर ३५ हजार बारदाना उपलब्ध झाला आहे. सरकारने मागण्यांची दखल घेऊन शेतक-यांना दिलासा दिल्याबद्दल धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार मानले. तर या प्रश्नात लक्ष घालून शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले.