मुंबई : प्रतिनिधी
सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून ही हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. वांद्रे-वरळी सागरीसेतू ते मरीन ड्राईव्हदरम्यान मुंबई सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. या हरित क्षेत्रांची निर्मिती मोठमोठ्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) करण्यात येणार आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने ४०० कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.
सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून जमीन तयार करण्यात आली आहे. भरावामुळे १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फूट भरावभूमी उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ५३ हेक्टर जागेत हरित क्षेत्र व नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या हरित क्षेत्राचा विकास मोठमोठ्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने भागिदारी संस्था, खासगी कंपन्या, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवले.
या विकासासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. मात्र पालिकेला यासाठी एकही पैसा खर्च करावा लागू नये, अशा पद्धतीने याचे नियोजन करण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिकेने आराखडाही तयार केला आहे. या कामांसाठी जून किंवा जुलै २०२४ पर्यंत निविदाही काढण्यात येणार होती. मात्र ही निविदा महापालिकेने काढली नाही.