मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचे महाअधिवेशन सध्या शिर्डीत सुरू आहे. या महाअधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेते तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, या महाअधिवेशनात व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमांसोबतच संविधानाची प्रत देखील ठेवण्यात आली आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.
दरम्यान,
भाजपाचे दोन दिवसीय महाअधिवेशन सध्या शिर्डीत सुरू आहे. ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी या अधिवेशनाची टॅगलाईन आहे. लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर विधानसभेत मिळालेले प्रचंड यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या अधिवेशनात भाजपचे १५ हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या महाअधिवेशनाची ही नवी टॅगलाईन सध्या जोरदार चर्चेत आहे. याच अधिवेशनात भाजपने महापुरुषांच्या प्रतिमेसोबत संविधानाची प्रत ठेवली आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. दररोज संविधानाची पायमल्ली करणा-या भाजपला आपल्या अधिवेशनात संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते हा काँग्रेसचा विजय आहे.
मात्र, ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांची प्रतिमा संविधानासोबत ठेवली आहे, त्यामुळे यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम असल्याचेही लोंढे यांनी म्हटले आहे. मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही, तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घे-यातच राहील, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेसने दिलेला ‘संविधान बचाव’ हा नारा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलून टाकणार, असा जोरदार प्रचार देखील तेव्हा काँग्रेसने केला होता. त्याचा परिणाम लोकसभेतील निकालावरही झालेला दिसला आणि महाराष्ट्रातील अनेक जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्यानंतर भाजपाने यातून बोध घेत विधानसभा निवडणुकीत हा अपप्रचार मोडून काढला, आणि घवघवीत यश मिळवले.