छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. यातून ठाकरे गट आता पुन्हा एकदा भावनिक आवाहनाचे राजकारण करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आणि पक्ष न सोडण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर भर मंचावर चंद्रकांत खैरे हे कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक झाल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही यावेळी या मेळाव्याला उपस्थित होते.