कोच्ची : केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयानेन्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीडितेवर २ वर्षात ६२ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात, एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून इतर आरोपींनाही अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पथाणामथिट्टा जिल्ह्यातील दोन पोलिस ठाण्यात नऊ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. संबंधित पीडिता १८ वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून ६२ जणांनी आपले लैंगिक शोषण केले, असा आरोप तिने तिच्या तक्रारीत केला आहे. तसेच, आपल्याला काही असे पुरावे मिळाले आहेत, जे, संबंधित पीडितेवर तिच्या क्रीडा प्रशिक्षकांनी, सहकारी खेळाडूंनी आणि वर्गमित्रांनी अत्याचार केल्याचे दर्शवतात असे पोलिसांनी म्हटले आहे.
सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आवाहन करत राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांकडून तीन दिवसांत कारवाईचा सविस्तर अहवाल मागितला आहे. केरळ महिला आयोगाने स्वत: हा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अध्यक्ष पी. सती देवी यांनी पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण बाल कल्याण समितीने आयोजित केलेल्या समुपदेशनादरम्यान समोर आले. जेव्हा, एका शैक्षणिक संस्थेत पीडितेच्या शिक्षकांनी समितीला तिच्या वर्तनात लक्षणीय बदल झाल्याची माहिती दिली. यानंतर समितीने पोलिसांना कळवले आणि तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, तिचे लैंगिक शोषण ती १३ वर्षांची असताना सुरू झाले. सुरुवातीला तिच्यावर शेजा-यानेच बलात्कार केला. त्याने मुलीचा अश्लील व्हीडीओ लोकांमध्ये शेअर केला. यानंतर त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. ज्याने हा व्हीडीओ पाहिला त्याने मुलीला ब्लॅकमेल केले आणि तिचे लैंगिक शोषण केले.