मुंबई : प्रतिनिधी
महायुतीचे सरकार आले म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असे शेतक-यांना वाटत होते. मात्र अर्थखाते सांभाळणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असले आश्वासन दिलेच नव्हते म्हणत कर्जमाफीपासून हात झटकले आहेत. त्यामुळे महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतक-यांना खरेच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडले आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी आणि महायुतीचे मतदार संभ्रमात पडले आहेत. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या.
यात भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांचे कर्ज माफ केले जाईल असे जाहीर केले होते. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला.
आता यावरून विरोधकांनीही रान उठवायला सुरुवात केली आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी करून दिली आहे. त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
जनता रस्त्यावर उतरणार : अनिल देशमुख
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतक-यांची कर्जमाफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिला.
आम्ही अंथरूणच वाढवू : प्रवीण दरेकर
एकीकडे अर्थमंत्री शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नव्हते असे म्हणताहेत. त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलंय. अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूणच वाढवू असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. तेव्हा भाजपने मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचे दरेकरांच्या विधानावरून दिसत आहे.