मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत झालेल्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांचे ५०० कोटी घेऊन ही कंपनी एकाच दिवसात गायब झाली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणा-या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कंपनीने १५ वाहने विकत घेतल्याचे आणि ५ वाहने आरक्षित केल्याचे पुरावे सापडले आहेत. आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना २५ लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रूम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागामालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी तपशिलाची चौकशी केली जात आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने वाहने बक्षीस म्हणून दिल्याचे समजताच अधिका-यांनी ती स्वीकारणा-या गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला. कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणा-या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आली असून या गाड्या जप्त कराण्याचा आर्थिक गुन्हे शाखा विचार करीत आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
टोरेसचा भांडाफोड कसा झाला?
५ जानेवारी रोजी टोरेसच्या शोरूममध्ये एका बैठकीत कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनात पगारावरून वाद झाला. त्यानंतर कर्मचा-यांनी शिवाजी पार्क पोलिसांत धाव घेतली. त्यांच्यासोबत काही गुंतवणूकदारदेखील पोलिस स्थानकात पोहोचले आणि हे प्रकरण पुढे आले.