22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeसंपादकीय‘मविआ’त वादाची ठिणगी

‘मविआ’त वादाची ठिणगी

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आघाडीतील तीनही पक्षांत सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटावर तोंडसुख घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी चंद्रपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेना (उबाठा) खासदार यांच्यावर निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले, नाना पटोले आणि संजय राऊत हे जागावाटपाच्या चर्चेत होते,

आम्हीही होतो. जर जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर १८ दिवस प्रचाराला मिळाले असते. आम्हाला योग्य नियोजन करता आले नाही, योग्य तो कार्यक्रम आखता आला नाही. त्यामुळे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ असे अनेक मुद्दे आघाडीच्या पराभवास कारणीभूत ठरले. यावर आपली बाजू मांडताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेची ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ अशी भूमिका आहे. याचा अर्थ आम्ही राहिलो नाही असे नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. आमचा पक्ष लढणा-यांचा आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, मोडलो नाही. आमचे २० आमदार आहेत, त्यातील एकाचेही म्हणणे नाही की, आपण समोर फुटलेल्या गटात सामील व्हावे आणि सत्तेची ऊब घ्यावी.

त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढत राहू. अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटावर टीका करताना म्हटले होते की, पराभवानंतरही काँगे्रसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. ठाकरे गट अजूनही झोपेत आहे. कोल्हे यांच्या टीकेला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आधी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ले देण्याचे कमी करावे. ‘मविआ’ला घरचा आहेर देताना वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सकाळी ११ ची वेळ ठरवायची. परंतु मविआचे काही नेते दुपारी २ वाजता यायचे. जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणे अपेक्षित असताना २० दिवस लागले. निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्या अनेक कारणांपैकी हे एक कारण होते. आता हे सारे पूर्वनियोजित होते का अशी शंका येते. जर जागावाटपाबाबत लवकर निर्णय घेतला असता तर आघाडीला त्याचा फायदा झाला असता.

विनाकारण वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का ते तपासावे लागेल असा संशयही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. वडेट्टीवार यांच्या पतंगबाजीनंतर संजय राऊत आपला पतंग उडवताना म्हणाले, जागावाटपावर वाद होता. अनेक जागा अशा होत्या ज्या आम्ही जिंकू शकलो असतो पण काँग्रेसने त्या सोडण्यास नकार दिला. चंद्रपूर, कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही मागितली होती. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही सहा वेळा जिंकली होती पण सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या. कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचे मुख्यमंत्रिपद हवे होते. (हा वडेट्टीवारांना टोला होता) काँग्रेसच्या केंद्रीय समितीने जागावाटपाच्या चर्चेत हस्तक्षेप करायला हवा होता असेही राऊत म्हणाले. खरे तर एकमेकांचे पतंग काटण्याच्या नादात आघाडीच्या पायावर धोंडा पडला! आघाडीतील तिन्ही पक्षांचे लक्ष आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आहे. परंतु सध्याच्या सैरभैर स्थितीत त्यांना यश मिळेल की नाही ते सांगणे कठीण आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत अमाप यश मिळालेल्या महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीत मात्र ससेहोलपट झाली. त्यानंतर आता आघाडीत सारेच पक्ष ‘एकला चलो रे’चे सूर आळवताना दिसत आहेत. त्यामुळे आघाडीत फूट अटळ असल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. ही चिखलफेक स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीच सुरू असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निकालानंतर आघाडीची एकही बैठक झाली नाही. त्यामुळेच आघाडीत बिघाडीचे संकेत दिसून येत आहेत. आघाडीच्या जागावाटपाचा किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचा विषय असू द्या, विधानसभा निवडणुकांच्या बैठकांमध्ये कधीच एकमत झाले नाही. त्यामुळे पक्षांना आणि संभाव्य उमेदवारांना तयारी करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. निकालानंतर आत्मपरीक्षण करण्यासाठी एकही संयुक्त बैठक घेण्यात आली नाही. प्रत्येक पक्ष आपलं वैयक्तिक चिंतन आणि बैठक घेण्यात मग्न आहे. ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या मूडमध्ये आहे. यामुळे महाविकास आघाडीची एकजूट आणि समन्वय निकालानंतर दिसलाच नाही.

एकमेकांच्या चुका आता जाहीरपणे बोलून दाखवण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्यांनी आघाडीची मूठ बांधली, वज्रमूठ घट्ट केली ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतही दुहीची बीजे पेरली जात आहेत. काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवून मराठेतर नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची मागणी केली आहे म्हणे. लोकसभेतील घवघवीत यशानंतर विधानसभा म्हणजे हातचा मळ आहे असा समज करून घेत आपण गाफील राहिलो, त्याची किंमत मोजावी लागली. आता गाफील राहू नका असे आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रीय स्तरावरही इंडिया आघाडीत फूट दिसून येत आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजणार नाहीत याची काळजी घेण्याची वेळ आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR