22.4 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावर दावा करण्याची स्पर्धा

शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावर दावा करण्याची स्पर्धा

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आले असून आता जवळपास दोन महिने होत आहेत. तरीदेखील जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. यामुळे यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्र्यांविनाच होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या मंत्र्यांमध्ये मात्र पालकमंत्रिपदावर दावा सांगण्याची स्पर्धाच लागली आहे. एकीकडे रायगडच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले यांनी दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे जळगावचे पालकमंत्री आपणच असू असे संकेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले आहेत.

मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा करताना मी पालकमंत्री व्हावे अशी येथील जनतेची इच्छा असल्याचे सांगितले होते. ते अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. तर सर्वसामान्य शेतक-याचा मुलगा आमदार झाला, आमदाराचा नामदार झाला, आता रायगडचा पालकमंत्रीही व्हावा, अशी रायगडकरांची इच्छा आहे. पण जे ईश्वराला प्रिय आहे तेच होईल. काही चांगले घडायचे असेल तर जरा वेळ लागतोच, असे गोगावले यांनी म्हटले होते.

यामुळे राज्यात पालकमंत्रिपदाच्या घोषणा व्हायच्या आधीच शिंदेंचे दावेदार तयार अशा चर्चा रंगल्या आहेत. राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत असल्यानेच अद्याप पालकमंत्री घोषित झालेले नाहीत. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र थेट दावे करण्यात येत आहेत. असाच दावा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांनी स्वत:ला जळगावचा पालकमंत्री म्हणून घोषित केले.

जळगाव तालुक्यातील वावदडा गावातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी भाषणात आपण जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देणार असल्याचे म्हणत आपणच पालकमंत्री होऊ असा दावा केला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR