मुंबई : टोरेस कंपनी घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून एकामागून एक या प्रकरणी खुलासे होताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे दादरचे कार्यालय कंपनीला २५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे दहावी नापास व्यक्तीला कंपनीचा सीईओ बनवण्यात आल्याचे आता समोर येत आहे.
टोरेस ज्वेलरी नावाने कार्यालय उघडून गुंतवणुकीच्या पाँझी स्कीमच्या माध्यमातून मुंबईसह उपनगरातील लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना ६ जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून एकामागून एक या प्रकरणी खुलासे होताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे दादरचे कार्यालय कंपनीला २५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे दहावी नापास व्यक्तीला कंपनीचा सीईओ बनवण्यात आल्याचे आता समोर येत आहे.
टोरेस कंपनीने मुंबईतील दादर, नवी मुंबई, कल्याण आणि मीरा-भाईंदर परिसरात टोरेस कंपनीने कार्यालय उघडून पाँझी स्कीमच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या मुख्य दोन आरोपींविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तपास सुरू असून विविध ठिकाणांहून २५ कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच एपीएमसीमधील टोरेस कंपनी कार्यालयाचा पंचनामा करीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास १ कोटी ९० लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता. याशिवाय टोरेसने लकी ड्रॉ अंतर्गत वाटल्या जाणा-या १४ महागड्या गाड्या देखील जप्त केल्या आहेत.
दहावी नापास व्यक्ती दादर कार्यालयाचा साईओ
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयाच्या सीईओ तौसिफ रियाज याचा सध्या शोध सुरू आहे. गुंतवणूकदारांच्या आधार कार्डच्या झेरॉक्सचे काम तौसिफ रियाजकडे होते. त्याने कंपनीला दादरचे कार्यालय फक्त २५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध दिल्यामुळे टोरेस कंपनीने त्याची मुंबई विभागाच्या सीईओपदी नियुक्ती केली होती.