मुंबई : (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कमा नये असे आदेश दिले. तपासाच्या प्रगतीबाबत वेळोवेळी कुटुंबीयांना माहिती द्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सीआयडी, तसेच एसआयटीकडून तपास सुरू आहे. मात्र या तपासाबद्दल देशमुख कुटुंबीय समाधानी नाहीत. या हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराड याला मकोका न लावल्याने एकूण तपासाबद्दलच शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तसेच, माझ्या भावासारखंच मलाही मारुन टाकलं जाईल, त्यापेक्षा मीच जीवन संपवतो म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केला. त्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन धनंजय देशमुख यांचे मन वळवले.
दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करून मकोका लावला जावा, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंर्त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कावत आणि सीआयडी अधिका-यांना फोन करुन मस्साजोग हत्याकांडप्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कुणालाही दयामाया दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तपास अधिका-यांना निर्देश दिले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन द्यायला आलो होतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता. त्यामुळे, आम्ही निवेदन गेटवर चिटकवलं आणि ठिय्या आंदोलन करु अस सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ देण्यात आली, आमचं निवेदनही स्वीकारलं, अशी माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, यात लक्ष घातलं तर ठीक आहे नाहीतर मराठा समाज मुख्यमंत्री असो किंवा कोणी आम्ही त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा केरे पाटील यांनी दिला. त्यावर, न्याय मिळवुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना दिले आहे.