मुख्यमंत्र्यांनी घेतला महाज्योतीचा घेतला आढावा
मुंबई : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीपसारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पुण्यासह इतर विभागीय क्षेत्रातील शहरांच्या ठिकाणी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना हे केंद्र सोयीचे होईल. विभागामार्फत चालविण्यात येणा-या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सीड अंतर्गत घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरीता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.