बीड : दिवसाला ५०० रुपये मजुरी देऊ, असे सांगत त्यांना ऊसतोड करण्यासाठी आणण्यात आले. महिनाभर ऊस तोडून घेतला. मजुरांनी पैसे मागितले आणि घरी जाण्याचा विषय काढताच त्यांना डांबण्यात आले. एका गावात त्यांना २४ तास ओलीस ठेवण्यात आले. इतकेच नाही, तर मजुरांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळले. सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेशात पोहोचलेल्या कामगारांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन ही व्यथा सांगितली. त्यानंतर हे सगळे प्रकरण समोर आले.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची जोरात चर्चा सुरू आहे. यावरून वातावरण तापलेले असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील एका ऊसतोड मुकादमाने ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातील १६ मजुरांना आणले. दिवसाला ५०० रुपये मजुरी देण्यात येईल, असे या मजुरांना सांगण्यात आले होते. हे मजूर बीडमध्ये आले. त्यांच्याकडून महिनाभर ऊसतोड करून घेतली गेली. डांबून ठेवण्यात आलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील कुठला तालुक्यातील आहेत. या मजुरांनी सुटका झाल्यानंतर घर गाठले आणि त्यानंतर जिल्हाधिका-यांची भेट घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. डांबून ठेवण्यात आलेल्या १६ मजुरांपैकी एक असलेल्या हरी सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बीडमध्ये ऊस तोडण्यासाठी नेण्यात आले होते.
५०० रुपये मजुरी देण्यात येईल असे सांगितले होते. पण, तिथे गेल्यानंतर मुकादमाने आमच्याकडून काम करून घेतले. त्यानंतर आम्हालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डांबून ठेवले आणि सोडण्यासाठी आमच्याकडूनच पैसे घेतले. आमच्या कुटुंबीयांनी २८ हजार ऑनलाईन पाठवल्यानंतर आम्हाला सोडण्यात आले. प्रत्येकाच्या कुटुंबाने प्रत्येकी १६०० रुपये जमा करून २८००० रुपये जमवले. त्यानंतर ते मुकादमाला देण्यात आले, असे एका मजुराने जिल्हाधिका-यांना सांगितले.
शिव सिंह नावाच्या मजुराने सांगितले की, ऊसतोडीसाठी आम्ही गेलो होतो. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करायचो. यासाठी ५०० रुपये मजुरी देऊ असे सांगितले होते. पण, एक महिना झाला. त्यानंतर ते म्हणाले की आणखी काम करा. आम्ही घरी जायचा विषय काढला, तर आम्हाला जीवे मारण्याची धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यानंतर आम्हाला २४ तास डांबून ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी म्हणाले की मजुरी करण्यासाठी या मजुरांना महाराष्ट्रात नेण्यात आले होते. बरेच दिवस त्यांनी काम केले, पण त्यांना पैसे देण्यात आलेच नाही. त्यांना घरी जाऊ देण्यासाठी पैसे घेण्यात आले. हे बेकायदेशीर आहे आणि तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक आणि कामगार अधिका-यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.