बेळगाव : कर्नाटकच्या प्रमुख राजकीय नेत्या आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेतून सुदैवाने त्या बचावल्या आहेत. पुणे-बंगळूरू महामार्गावर एका झाडावर त्यांची कार आदळल्याने हा अपघात झाला आहे. बंगळुरू येथून बेळगावला येत असताना अचानक समोर कुत्रा आल्यामुळे कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार झाडावर आदळून हा भीषण अपघात घडला. पुणे बंगळुरू महामार्गावर कित्तूर येथे ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांनी फोनवरुन घटनेची माहिती घेत विचारपूस केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या त्याचा भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांसोबत प्रवास करत होत्या. त्यावेळी, आज पहाटे ५ वाजता कित्तूरजवळ ही अपघाताची घटना घडली. चन्नराज हट्टीहोळी हे कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आहेत. या अपघातात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला. अपघातानंतर कारच्या सर्व सहा एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर व चेह-याला किरकोळ दुखापत झाली, तर आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्हीया डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज पहाटेच्या सुमारास रस्त्यात कुत्रे आडवे आल्यामुळे त्याला वाचवायला जाताना हा अपघात घडला अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल यांनी दिली.
दरम्यान, लक्ष्मी हेब्बाळकर या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे, या अपघाताची माहिती मिळताच सहकारी मंत्र्यांनी व निकटवर्तीय पदाधिका-यांंनी फोनवरुन विचारपूस केली. तसेच, काही समर्थकांनी रुग्णालयाकडेही धाव घेतली. सुदैवाने सध्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची प्रकृती स्थिर आहे.