लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था
अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीमध्ये आतापर्यंत हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या भीषण घटनेत अनेक जणांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास गेल्या आठवड्यापासून लॉस एंजेलिस शहर आगीमध्ये धुमसत आहे. मात्र कॅलिफोर्निया येथील जंगलात लागलेल्या आगीत मालिबू येथील एक घर चमत्कारिकरित्या बचावले आहे. वणव्यातून बचावलेल्या या घराची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे.
कॅलिफोर्नियातील वणव्यांमध्ये मार्गात येणारे सर्व काही गिळंकृत झालं आहे. इथली जंगले आणि परिसर कोळशामध्ये बदलून गेला आहे. मात्र मालिबूमधील ९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे तीन मजली घर अजूनही शाबूत असल्याचे समोर आलं आहे. ज्वाला शांत झाल्यानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये हे घर दिसून येत आहे. मात्र त्याच्या शेजारील घरांसह, अनेक बाबी जळून खाक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार आजूबाजूला धूर निघत असताना आमचे घर अजूनही उभे असल्याचे पाहून मी थक्क झालो. मालिबू येथे असलेल्या या घराच्या मालकाचे नाव डेव्हिड स्टेनर आहे. डेव्हिड स्टाइनर हे टेक्सासमधील निवृत्त कचरा-व्यवस्थापन कार्यकारी आहेत. डेव्हिड स्टेनर यांनी हा एक चमत्कार असल्याचे म्हटलं आहे.