बहुतेक देशांत सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये ८ ते ९ तास काम करण्याची संस्कृती आहे. मात्र इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले तर जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत स्पर्धा करणे शक्य होईल असे म्हटले होते. नारायण मूर्ती यांचे मत व्यक्त झाल्यानंतर लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यमही फॉर्मात आले. त्यांनी नारायण मूर्ती यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत कर्मचा-यांनी एका आठवड्यात ९० तास काम करावे असा सल्ला दिला. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचे पेव फुटले आहे. अब्जावधी डॉलरची कंपनी आपल्या कर्मचा-यांना शनिवारीही कामावर का बोलावते असा सवाल करण्यात आला तेव्हा सुब्रमण्यम म्हणाले, मी कर्मचा-यांना रविवारी कामावर बोलावू शकत नाही याचे वाईट वाटते. रविवारीही कर्मचा-यांना बोलवता आले असते तर मला आनंद झाला असता. कारण मी रविवारीही काम करतो.
कर्मचा-यांनी सुटीच्या दिवशी घरी थांबण्याची कल्पना फेटाळून लावताना सुब्रमण्यम म्हणाले, तुम्ही घरी बसून काय करता? बायकोकडे किती वेळ टकमक पाहू शकता? बायकोसुद्धा किती वेळ तुमच्याकडे पाहू शकते? त्यापेक्षा ऑफिसला जा आणि कामाला लागा! कंपनीच्या फायद्यासाठी सुब्रमण्यम यांची विचारधारा योग्य असेलही, परंतु माणूस म्हणजे यंत्र, मशिन नाही. त्याला विश्रांतीची गरज असते, मेंदूला आराम मिळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस सुटीची गरज असते हे मालक वर्गाच्या डोक्यात कधी शिरणार? घाण्याच्या बैलासारखे माणूस काम करत राहिला तर होणारे कामही व्यवस्थित होणार नाही. बाहेर देशातील कर्मचा-यांची आणि भारतातील कर्मचा-यांच्या कामाची तुलनाच होऊ शकणार नाही. कारण विदेशात कमी काम आणि चांगला पगार आहे. भारतीयांना भरपूर काम करावे लागते आणि दाम मात्र कमी मिळतो.
भारतीय खरोखरच किती तास काम करतात या प्रश्नाचे उत्तर देताना जागतिक कामगार संघटना म्हणते, भारतीय लोक दर आठवड्याला ४७.८ तास काम करतात तर अमेरिकेसारख्या विकसित देशातील कामगार आठवड्याला ३८ तास काम करतात. भारतीय कामगारांना दर आठवड्याला सरासरी ५० डॉलर्स (८०० रुपये) वेतन मिळते तर अमेरिकेत कामगारांना दर आठवड्याला ८६ हजार रुपये वेतन मिळते. म्हणजेच भारतात भरपूर काम करूनही कमी पगार मिळतो, तर अमेरिकेत कमी काम असूनही चांगला पगार दिला जातो. जागतिक कामगार संघटनेच्या माहितीनुसार जास्त तास काम करणा-या देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो. भारतीय लोक दर आठवड्याला ४७.८ तास काम करतात तर ५१ टक्के भारतीय ४९ तासांपेक्षा अधिक काम करतात. जगातील सर्वाधिक श्रीमंत देश असलेल्या ‘जी-७’ देशांमध्ये कामाचे तास कमी आहेत.
जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत आठवड्याला ३८ तास काम केले जाते. तेथे ४९ तास काम करणा-यांची संख्या १३ टक्के आहे. ब्रिटनमध्ये ३५.८ तास, जपानमध्ये ३६.६ तास, जर्मनीत ३४.२ तास काम केले जाते. जगात सर्वाधिक कामाचे तास भूतानमध्ये आहेत. तेथे ६१ टक्के कामगार आठवड्याला ४९ तास काम करतात. बांगला देशात ४७ टक्के, पाकिस्तानातील ४० टक्के कामगार ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात. कमी तास काम करणा-या देशांत वनुआतु देशात आठवड्याला २४.७ तास, किरिबातीत २७.३ तास, मायक्रोनेशियात ३०.४ तास, रवांडा ३०.४ तास तर सोमालियात ३१.४ तास काम केले जाते. ब्राझीलमध्ये आठवड्याला ३९ तास, रशियात ३९.२ तास, चीनमध्ये ४६.१ तास, दक्षिण आफ्रिकेत ४२.६ तास काम केले जाते. ‘ब्रिक्स’ देशांत सर्वांत जास्त कामाचे तास केवळ भारतात आहेत. कर्मचा-यांनी आठवड्यात किती तास काम करावे याबद्दल इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी किमान ७० तास काम करावे असे म्हटले होते.
त्यात ‘एल अँड टी’चे अध्यक्ष सुब्रमण्यम यांनी किमान ९० तास कर्मचा-यांनी काम करावे, रविवारी देखील सुटी घेऊ नये असे म्हटल्याने वाद पेटला होता. घरी बसून काय करता, बायकोकडे किती वेळ पाहणार, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे भडका उडाला आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि ‘सीरम’चे अदर पूनावाला यांनीही त्यात उडी घेतली. ‘शार्क टँक इंडिया’चे अनुपम मित्तल यांनी सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर मजेशीर उत्तर देताना ट्विट केले ते असे ‘पण सर, जर पती-पत्नीने एकमेकांकडे पाहिले नाही तर आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कसा बनू?’ अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा म्हणाले, हा वाद चुकीच्या दिशेने जातोय. मी नारायण मूर्ती आणि सुब्रमण्यमचा आदर करतो, पण माझे असे म्हणणे आहे की, आपण कामाच्या तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. माझी पत्नी एक सुंदर स्त्री आहे.
त्यामुळे तिच्याकडे बघायला मला आवडतं. आपण कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचा संबंध ७० ते ९० तास काम करण्याशी येणार नाही. आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलेले मत अतिशय महत्त्वाचे आहे. कामगार वर्गानेही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘सीरम’चे अदर पूनावाला यांनीही आनंद महिंद्रांच्या सूचनेला दुजोरा दिला आहे. ‘रविवारी सुद्धा माझी पत्नी माझ्याकडे बघतच असते’ असे ट्विट त्यांनी केले. सर्वसामान्य कर्मचारीसुद्धा आठवड्याच्या सुटीबद्दल म्हणेल, आठवड्याच्या सुटीचा आनंद काय असतो ते ‘तुम क्या जानो सुब्रमण्यम बाबू’? टकमक बघत राहणे, टक लावून बघणे यातला आनंद काही वेगळाच आहे, काम गेले उडत! अत्याधुनिक यंत्र-तंत्रासह सुसज्ज कंपनीत काम करणारे उच्चाधिकारी आर्थिकदृष्ट्या संपन्न असले तरी मनाने ‘आधुनिक’ असतीलच असे नाही!