26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसोयाबिन तुपाशी, तूर उपाशी!

सोयाबिन तुपाशी, तूर उपाशी!

लातूर : विशेष प्रतिनिधी
सोयाबीन शेतक-यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला. सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तर दुसरीकडे तूर उत्पादक शेतक-यांना फटका बसला. गेल्या सात महिन्यात भावातील मोठी घसरण डोकेदुखी ठरली आहे. गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये तुरीचा भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहचला होता. आता तूर ही प्रति क्विंटल ७ हजारांवर आली आहे.

तुरीला प्रति क्विंटल ७,५५० रुपये हमीभाव आहे. पण तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. यावर्षी तुरीचे पीक बहरले आहे. सुरूवातीला तुरीला चांगला भाव मिळाला. पण सात महिन्यानंतर तुरीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. व्यापा-­यांनी तुरीचा भाव पाडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये तुरीचा भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहचला होता. जुलै २०२४ मध्ये तुरीला प्रति क्विंटल १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत होता. खरीपातील तूर आता शेतक-यांच्या हाती आली आहे. पण गेल्या ६-७ महिन्यात तुरीचे भाव कमी झाले. शेतक-यांना क्विंटलमागे ५ हजारांचा फटका बसला. आता तूर ही प्रति क्विंटल ७ हजारांवर आली आहे. म्हणजे एकरी पाच क्विंटल तूर उत्पादन घेणा-या शेतक-यांना सामान्यत: २५ हजारांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

सोयाबीनसाठीच बारदाना नसताना शेतक-यांना तूर विक्रीसाठी तरी बारदाना कुठून मिळेल असा सवाल शेतक-यांनी करत सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. तूर खरेदी हमीभावाने कधी करण्यात येईल, असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला आहे. त्यामुळे घोषणेपूर्वी सरकारने निदान राज्यातील खरेदी-विक्री केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

कांदा गडगडला…
कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, ८ जानेवारीला कांद्याची सरासरी किंमत २१२८.८४ रुपये प्रति क्विंटल होती. तर महिनाभरापूर्वी ८ डिसेंबर २०२४ रोजी ते ३७८६.५६ रुपये प्रति क्विंटल होती. सध्या सोलापूर, येवला आणि धुळे मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ २०० रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच २ रुपये किलो झाला आहे. जगभरात सुमारे २५ टक्के वाटा असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे. तर भारतात सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे, राज्यात देशातील ४३ टक्के कांद्याचे उत्पादन होते. बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल, ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याचा शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR