मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकारण तापले आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून वाल्मिक कराड याची आई आणि समर्थकांनी मोठा गदारोळ करत आंदोलन केले आहे. आरोपीच्या समर्थनार्थ केले जाणारे आंदोलन हे घातक असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मुंबई दौ-यावरून खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी येत असतील तर त्यांचं मुंबई स्वागतच करेल. ते तर आमचे देशाचे पंतप्रधान आहेत.
आता धारावीचा प्रश्न आहे. आम्ही त्यांच्याकडे धारावी आमची लुटू नका म्हणून मागणी केली आहे. बघू आता धारावीबाबत काही घोषणा करतात का. आता पंतप्रधान हे मणिपूरमध्ये कधी जाणार हे देखील पाहावे लागेल. दिल्ली निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांना प्रचाराचं कोणते काम नसेल त्यामुळे त्यांनी मणिपूरला जावे, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.
महायुतीचे ४० टक्के नेते कलंकित
महायुतीमधील नेते हे कलंकित आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. आता ते कसे काय स्वच्छ झाले? त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि इतरांना एक न्याय हा काय प्रकार आहे? हा फार संशोधनाचा विषय आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.