छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञात मारेक-यांनी फ्लॅटमध्ये घुसून विद्यार्थ्याचा गळा चिरला आहे.
ऐन संक्रांतीच्या दिवशी मित्र बाहेर गेल्यानंतर मारेकरी घरात घुसले आणि विद्यार्थ्याची हत्या केली आहे. हत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रदीप विश्वनाथ निपटे असे हत्या झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील भाजीवालीबाई परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये रहात होता. त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ आणि इतर तीन मित्रही रहात होते. मंगळवारी सायंकाळी सर्व जण कॉलेजमधून घरी परतले होते. यानंतर सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते. यावेळी प्रदीप एकटाच फ्लॅटवर थांबला. पण रात्री १० वाजता जेव्हा प्रदीपचा भाऊ आणि मित्र फ्लॅटवर परतले, तेव्हा प्रदीप गळा चिरलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडला होता.
फ्लॅटमध्ये अशाप्रकारे प्रदीपची हत्या झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. प्रदीपच्या हत्येला काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. हत्येच्या तीन दिवस आधी ११ जानेवारीला प्रदीपच्या मित्रांचा आणि कॉलेजमधील काही तरुणांचा वाद झाला होता. एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून हा वाद झाला होता. या वादानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली होती.