बीड : प्रतिनिधी
वाल्मिक कराडला आज एसआयटीने बीड येथील कोर्टात हजर केले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कराड याच्यावरील गुन्ह्याची यादी कोर्टासमोर दिली. त्यात ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दुपारी ३.२० ते ३.३० वाजता संभाषण झाले होते. त्याचवेळी संतोष देशमुख अपहरण झाले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता असं अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले.
तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात माहिती दिली की, ९ डिसेंबरला दुपारी ३ ते ३.१५ या काळात संतोष देशमुखचं अपहरण झाले होते. देशमुख अपहरण आणि तिन्ही आरोपींच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती आहे. १० मिनिटे आरोपींसोबत वाल्मिक कराडशी संभाषण झाले असं त्यांनी सांगितले. तिन्ही आरोपींमध्ये झालेले संभाषण पाहता पुढील तपासासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडच्या १० दिवस कोठडीची मागणी केली आहे. घटनेच्या दिवशीच्या संभाषणात नेमकं काय बोलणं झाले हेदेखील अधिकारी येणाऱ्या काळात कोर्टात मांडणार आहेत का हे पाहणे गरजेचे आहे.
तसेच वाल्मिक कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी सरकारी वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आली. कराडवर मकोका का लावण्यात आला याच्यासाठी ही यादी कोर्टाला देण्यात आली. कराडच्या पोलीस कोठडीसाठी ९ बाबी एसआयटीने कोर्टासमोर मांडल्या. त्यात हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना कराडने धमकी दिल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या सुनावणीसाठी केवळ न्यायाधीश, तपास अधिकारी, आरोपी, आरोपीचे वरील आणि सरकारी वकील एवढेच उपस्थित आहेत. या सुनावणीचं चित्रिकरण करण्यात येत आहे.
दरम्यान, आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि गुन्ह्यातील आरोपी सराईत आहेत. पोलिसांनी हजारो कॉल रेकॉर्ड तपासले त्यातून आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यातील संभाषण पुढे आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी एसआयटीने केली. खंडणी प्रकरणा वाल्मिक कराडला अटक केली होती. त्यानंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी कराडला सुनावण्यात आली होती. एसआयटी तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमोर १० मिनिटांच्या संभाषणाचा पुरावा सादर केला. त्यातूनच पुढे तपासासाठी कराडच्या कस्टडीची मागणी केली जात आहे.