प्रयागराज : महाकुंभातील बातम्यांमध्ये सर्वाधिक चर्चा साध्वी रिछरियाची होत आहे. मॉडेल आणि अॅँकर असलेल्या हर्षा रिछारिया दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्या. प्रयागराजमधील महाकुंभात त्यांच्याबाबत नवीन वाद समोर आला आहे. हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्रान करु देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, महाकुंभात ही परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. ही विकृत मानसिकता आहे. महाकुंभात चेह-याचे सौंदर्य नाही तर ह्रदयाची सुंदरता पाहिली जावी. मनाची सुंदरता पाहिली जावी. ज्याने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावे, हे निश्चित केले नाही, त्यांना संत-महात्मांच्या शाही रथावर स्थान देणे चुकीचे आहे. भक्त म्हणून त्यांचा सहभाग ठीक आहे, पण भगवे कपडे परिधान करुन शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रमाणे पोलिसांचा गणवेश केवळ पोलीस दलात सहभागी असणा-यांना मिळतो, तसे भगवे वस्त्र फक्त संन्यासींना मिळते.
हर्षा रिछारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्या आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा या साध्वी होण्यासोबत एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांचे फॅन त्यांना महाकुंभ २०२५ फेम असा किताब देत आहेत. एका रात्रीत त्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या. महाकुंभ २०२५ मध्ये आलेल्या सर्वात सुंदर साध्वी असे त्यांना म्हटले जात आहे.