22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रधार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वनियोजित हल्ला

धार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वनियोजित हल्ला

सैफ अली खानवरील हल्ल्यावरून आव्हाडांचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सहा वेळा धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्याच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग दिला जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत सैफ अली खानवर झालेला हल्ला हा धार्मिक कट्टरतावाद्यांकडून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान,
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या राहत्या घरी हा हल्ला करण्यात आला असून यामुळे सर्वांनी काळजी व्यक्त केली आहे. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले असून त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

यावरून मात्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी सत्ताधारी महायुती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. या प्रकरणावर बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

ते म्हणाले, गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने सैफ अली खानला त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेनेही तपास होणे आवश्यक आहे, असा गंभीर सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जीवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणा-­या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष! विष रंग दाखवतंय का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध जोडले आहेत. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, सैफ अली खानवर चाकूहल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे.

काल पंतप्रधान मुंबईत होते. सगळी सुरक्षा व्यवस्था तिथे असणार. पंतप्रधान मुंबईत असले, तरी या राज्यात काय चाललं आहे, हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आम्ही भाष्य केले की त्यांना यातना होतात. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाही. घरात, झोपडीत, चाळीत कुठेही चोर-दरोडेखोर घुसत आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सुप्रिया सुळेंनी केली कुटुंबियांची विचारपूस

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सैफ अली खानच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. पुण्यातून सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांची फोनवर चौकशी केली आहे. यावेळी त्यांनी करिश्मा कपूर हिच्यासोबत संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांच्याकडे चौकशी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR