मुंबई : प्रतिनिधी
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खानवर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून, सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून, हे सरकारचे अपयश आहे अशी टीका करत नाना पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाजपा सरकारचा समाचार घेतला.
नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलिस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत. मुंबईला दोन पोलिस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा- सुव्यवस्था आहे, ना मुंबईत.
बीडमधील संघटित गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशीर्वाद, परभणीत पोलिस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्रिपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही.
निष्क्रिय, कमजोर गृहमंत्री लाभले
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू, अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असे निष्क्रिय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.