21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रगुजरातच्या गाढवांचा महाराष्ट्रात बोलबाला

गुजरातच्या गाढवांचा महाराष्ट्रात बोलबाला

जेजुरीतील खंडोबा यात्रेत लाखोंची उलाढाल

पुणे : प्रतिनिधी
खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत. या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरतो. या बाजारात देशभरातून गाढवे विक्रीला आणली जातात. यात गुजरातच्या काठेवाडी गाढवाला चांगला दर मिळाला. तर देशी गाढवाला जेमतेम दर मिळाला. येथे येणारे भाविक डोंगर-दरीतील कामासाठी गाढवाची खरेदी करतात.

यावेळी या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात पुण्याच्या गाढवांपेक्षा गुजरातच्या काठेवाडी गाढवांना सर्वाधिक भाव मिळाला.
जेजुरी येथील गाढवांच्या बाजारात देशभरातून गाढवं विक्रीला आणली जातात. यात गुजरातच्या काठेवाडी गाढवांना ५० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला. गावठी गाढवांना २५ हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मात्र, बाजारात यंदा गाढवांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे गाढवांना चांगला भाव मिळाला. गाढवाचे दात, वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड, जवान असे म्हटले जाते. अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळते.

गाढवांची खरेदी-विक्री
पौष पौर्णिमेला जेजुरी येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. तसेच, गाढवावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या या भटक्या जमातींतील हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले. कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवांची खरेदी-विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेतात. दक्षिण भारतातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून माळेगावच्या श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेची ओळख आहे. जेजुरीनंतर माळेगावातील यात्रेत सर्वांत मोठा गाढवांचा बाजार येथे भरतो. या यात्रेत गाढवांचा बाजार भरवण्याची परंपरा ही मागील ४०० ते ५०० वर्षांपासून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR