अमरावती : प्रतिनिधी
पर्यावरण संतुलनामध्ये पक्ष्यांचे स्थलांतरण हे अतिशय महत्त्वाचे असते. हिवाळ्यात विदेशातील पक्षी महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक पानवठ्यांवर आलेली दिसतात. जवळपास ६० ते ७० प्रजातींमधील नवे पक्षी हिवाळ्यात तलाव आणि नद्यांच्या परिसरात पक्षी मित्राचे लक्ष वेधून घेतात.
सध्या अमरावती शहर आणि जिल्ह्यात असणा-या पानवठ्यांवर मोठ्या संख्येने कॉमन पोचार्ड, कॉकटेल पोचार्ड, विविध प्रजातींचे बदकं, हंस, व्हाईट स्टार्क, ग्रेटर स्कूप, मलार्ड, लांब पाय असणारा चिखलपक्षी असे पानपक्षी आणि रानपक्षी दिसत आहेत. शहरालगतच्या वडाळी आणि छत्री तलावात बदकांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात, असे पक्षी निरीक्षक यादव तरटे पाटील यांनी सांगितले.
आपल्या परिसरात युरोप, मध्य आशिया, मंगोलिया, युरेशिया या भागातून हे पक्षी आले आहेत. यापैकी व्हाईट स्टार्क हे युरोपमधून आले आहेत. तर मलार्ड हे पक्षी रशिया, कझाकिस्तान, मंगोलिया आणि सायबेरिया या देशांमधून आले आहेत. ग्रेटर स्कूप हा पक्षीदेखील रशिया आणि कझाकिस्तानमधून आला, असे यादव तरटे पाटील यांनी सांगितले. निसर्गचक्रामध्ये पक्षी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी माहिती पक्षी निरीक्षक यादव तरटे पाटील यांनी दिली.
विदेशी पक्ष्यांचा मार्चपर्यंत मुक्काम
संपूर्ण भारतात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात विदेशातील पक्षी अन्न शोधण्यासाठी स्थलांतर करून येतात. अमरावती जिल्ह्यात पानवठ्याच्या परिसरात सुमारे ६० ते ७० प्रजातींचे विदेशी पक्षी वास्तव्याला येतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत या पक्ष्यांचा मुक्काम अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील पानवठ्यांवर असतो. मार्च महिन्यात आपल्या भागात उन्हाळा सुरू होताच हे सर्व विदेशी पक्षी पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परततात.