19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रवंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी प्रक्रिया यशस्वी

वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी प्रक्रिया यशस्वी

मुंबई ते अहमदाबाद प्रवास, ताशी १३० कि.मी. वेगाने धावली रेल्वे, लवकरच सेवा

मुंबई : प्रतिनिधी
वंदे भारत ही लोकप्रिय ठरलेली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर ट्रेनची चर्चा सुरू आहे. आता या ट्रेनची ट्रायल झाली आहे. मुंबईवरून अहमदाबाद अशी ही ट्रेन धावणार आहे. अहमदाबादवरून सकाळी ७:२९ वाजता ही ट्रेन निघाली. दुपारी १:५० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली. ही ट्रेन १३० किमी प्रतितास वेगाने धावली. ट्रायल रनमध्ये ट्रेन १८० किमी धावू शकते. या ट्रेनची मागील ३ दिवसांत वेगवेगळ््या ठिकाणी ट्रायल झाल्या.

रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन चाचण्या पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात अंतिम प्रमाणपत्र जारी करेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर वंदे भारत स्लीपर कोच कधीपासून सुरु करायची यासंदर्भात निर्णय रेल्वे बोर्ड घेईल. त्याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणा-या प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. त्यामुळे या सेवेची प्रवासी वाट पाहात आहेत. ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत या अगोदरच रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत.

एका अधिका-याने सांगितले की, ट्रॅकवरील चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या ट्रेनच्या अधिक प्रगत चाचण्या करण्यात येतील. यामध्ये १३० किमी प्रतितास वेगाने कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन नावाच्या चाचणीचा समावेश असणार आहे. ट्रॅक कंडिशन, सिग्नलिंग सिस्टीम, ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन इक्विपमेंट आणि इंजिन आणि कोचची एकूण फिटनेस यासारख्या अनेक पॅरामीटर्सचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी चाचण्या पूर्ण केल्या जातील. त्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

यापूर्वी या ठिकाणी झाल्या चाचण्या
मुंबई-अहमदाबाद मार्गापूर्वी वंदे भारत ट्रेनची चाचणी झाली आहे. २ जानेवारी रोजी राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील कोटा आणि लबान दरम्यानच्या ३० किमी अंतरावर चाचणी घेण्यात आली. तिथे ट्रेनने १८० किमी प्रतितास इतका वेग गाठला. तसेच १ जानेवारी रोजी रोहळ खुर्द ते कोटा दरम्यानच्या ४० किमी अंतरावर ताशी १८० किमीचा वेग नोंदवण्यात आला होता. कोटा-नागदा सेक्शनवर ताशी १७० किमी आणि रोहल खुर्द-चौमळा सेक्शनवर १६० किमी प्रतितास वेग गाठला गेला. या चाचण्या आरडीएसओच्या देखरेखीखाली घेतल्या जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR