17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणात ठाकरे गटाला खिंडार

कोकणात ठाकरे गटाला खिंडार

बडा मासा शिंदेच्या गळाला उदय सामंतांनी प्रवेशाची माहिती

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अंतर्गत घरघर लागल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणा-यांची तक्रार करूनही पक्षप्रमुखांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेत अस्वस्थ आहेत. दुसरीकडे, भास्कर जाधव यांनीही घरचा आहेर दिला आहे. एकीकडे पक्षात अस्वस्थता असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला आहे, त्यामुळे ठाकरे गटाला येत्या काही दिवसांत कोकणात खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी कोकणातील राजकीय घडामोडीबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (ता. १८ जानेवारी) दाओसला जात आहेत, दुस-या दिवशी म्हणजे १९ जानेवारी रोजी मी दाओसला जाणार असून २४ जानेवारी रोजी परत येणार आहे. येत्या २४ तारखेपर्यंत आपण वाट बघावी. महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेला पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील फार मोठा पक्षप्रवेश येत्या आठ दिवसांत होणार आहे, असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.

संगमेश्वर आणि रत्नागिरीमधील प्रवेश असतील का, यावर उदय सामंत म्हणाले, मी पंधरा दिवसांपूर्वीही असे सांगितले होतं की, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेली आहे. आम्हाला गद्दार म्हणणा-यांना आता वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो, ते काँग्रेसबरोबर गेल्यामुळे आमची सत्य परिस्थिती तशी आहे. त्याबाबतची जाणीव झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील लोक आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरीबद्दल बोलायचे झाले तर शिवसेनेची ज्या पद्धतीने काँग्रेस झाली आहे, तीच परिस्थिती ठाकरे गटाची या जिल्ह्यात झालेली दिसणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षातील काही लोकांनी आपल्या विरोधात काम केल्याचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचे म्हणणे आहे. त्यासंबंधीचा अहवालही साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र, पक्षाच्या विरोधात काम करणा-यांवर अजूनही कारवाई झालेली नाही, त्यामुळे राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पक्ष सोडण्याबाबत यापूर्वीही बातम्या आलेल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR