मालेगाव : महाराष्ट्रात घुसखोरी केलेल्या बांगलादेशीविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चांगलीच मोहीम उघडली असून, आज मालेगाव इथे तहसीलदार आणि पोलिसांची भेट घेत तक्रार केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी बांगलादेशीच्या घुसखोरीमागे काही अधिकारी, राजकीय एजंट असून, मालेगावातील एक नेता अतिरेकी संघटनांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज मालेगाव दौ-यावर होते. तिथं त्यांनी बांगलेदशी घुसखोरांना मिळालेल्या सरकारी कागदपत्रांवरून, जन्म नोंदणी प्रमाणपत्रावरून तहसीलदारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात जात याप्रकरणी तक्रार दाखल केली. किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारात स्वत: लक्ष घातल्याने घुसखोरीचे षडयंत्र बाहेर येऊ लागले आहेत. मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात आजपर्यंत ४०७७ अर्ज आले आहेत, यात घुसखोरांना नागरिकत्व मिळू शकते. तहसीलदारांनी दाखल अर्जांमध्ये फक्त १०३ अर्ज नाकारले. यामुळे दाखल चार हजार अर्जांमध्ये किती घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते? हा खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे.
मला या घुसखोरीबद्दल काही माहिती माहिती अधिकारातून मिळाली आहे. यात कोण कोण अधिकारी, राजकीय लोक आहेत आणि बांगलादेश बॉर्डरवर कोण एजंट करीत आहेत, याची माहिती मला आहे. याशिवाय मालेगावातील एक नेता अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आहे असे सांगून खळबळ उडवून दिली. या सर्व प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून आता हा सगळा तपास पोलिसांनी करायचा आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
पोलिसांना शंभर लोकांची यादी पुराव्यासह दिली आहे. अशाप्रकारे चीटिंग केली आहे, सरकारी यंत्रणाची फसवणूक केली असून सरकारी यंत्रणेतील काही अधिकारी यात सहभागी आहेत. पुरावे पक्के असल्याने येत्या दोन ते चार दिवसात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल. ही घुसखोरी म्हणजे, भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे. त्यामुळे या मोहिमेच्या पाठपुराव्यात कुठेही कमी पडणार नाही. यात कोणाचीही बदनामीचा विषय नाही. व्होट जिहाद समर्थकांना बदनामीच वाटणारच, असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी लगावला.