पूर्णा : तालुक्यातील चुडावा येथील नांदेड पूर्णा राज्य राज्य महामार्ग क्र ६१वर दुचाकी व चार चाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चुडावा शिवारात नांदेड पूर्णा राज्य महामार्गावर दि. १७ जानेवारी रोजी दुपारी १२.३० ते १च्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक एमएच २६ सी एच २०३३मध्ये पाच जण नांदेडकडून पुर्णेच्या दिशेने येत होते तर दुचाकी क्र एम एच २६ सी सी ६५२९ वरुन वसमतकडे जात होते. यात दुचाकीवर नरोजी रामजी येवले (अंदाजे वय ५५) रा. मार्कड ता. जि. नांदेड व नारायण बाबुराव पुंड (अंदाजे वय ३३) रा. पिंपळगाव ता.जि. नांदेड हे दोघे वसमतच्या दिशेने जात असताना दोन्ही वाहनांचा अपघात झाला. चार चाकी व दुचाकी रोडच्या बाजूस असलेल्या खड्डयामध्ये गेली.
चार चाकी चालक व त्यांच्या बाजूस बसलेले यांनी सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे त्यांना मार लागला नसल्याचे सांगितले तर दुचाकीस्वार नरोजी येवले यांच्या मानेला जास्त ईजा असल्याचे प्रथमोपचारात चुडावा येथील खाजगी डॉ. सोळंके यांनी सांगितले तर नारायण पुंड यांच्याही डोक्याला आणि डाव्या पायाला मुक्कामार असल्याचे डॉक्टर म्हणाले. त्यांच्यावर चुडावा येथे औषध उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी धाव घेऊन अधिक माहिती घेतली. बातमी लिहेपर्यंत पोलिस स्टेशन येथे नोंद घेतलेली नव्हती.