पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मागून येणा-या एका ट्रकने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कार ही एका एसटी बसवर जाऊन आदळली. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक हा भीषण अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. सकाळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणा-या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली. या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक पसार झाला आहे. हा ट्रक हरियाणा इथला असून त्याच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आयशर आणि बसदरम्यान सापडल्याने मॅक्झिमा कारचा चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमोला बसली.