परभणी : तालुकास्तरावर जनतेची कामे होत नसल्याबाबत तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत अशा अनेक तक्रारी जनतेतून करण्यात येत आहेत. बहुतांशी विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवून गैरप्रकार करण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे निदर्शनास येत आहेत. जनतेची अडवणूक करणा-यांची यापुढे गय केली जाणार नाही असा इशारा आ. राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदार संघ आढावा बैठकीत बोलताना विभाग प्रमुख, अधिका-यांना दिला आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख, अधिका-यांची आढावा बैठक आज संपन्न झाली. सुमारे पाच तास चाललेल्या बैठकीत जवळपास ३२ विभागाचे उपविभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी आ. विटेकर म्हणाले की, सेवा हक्क कायद्या प्रमाणे नागरिकांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून ४५ दिवसाच्या आत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे अधिका-यांवर बंधनकारक आहे. सर्रासपणे पैशाची लूट अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून केली जात असल्याने जनता हतबल झाली असून हे प्रकार यापुढे चालणार नाहीत. तुम्हाला कार्यालये, रिक्त पद भरती, जेवढा पाहिजे तेवढार निधी मी आणून देतो, तुम्ही फक्त प्रस्ताव तयार करा, वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी नोंदवा मी पैसे मंजूर करून आणतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे ४ हजार कोटी रुपयांची तरतूद पाथरी विधानसभा मतदार संघातील विकास कामासाठी केलेली आहे. तुम्ही फक्त तुमच्या विभागाचे प्रस्ताव मंत्रालया पर्यंत पोहोचविण्याचे काम करा, बाकीचे मी पाहतो. मतदार संघातील विभाग प्रमुखांनी आपापल्या कर्मचा-यांना तंबी द्या आणि जनतेसाठी काम करा पैशासाठी करू नये असे स्पष्ट शब्दात त्यांना सांगण्याचे भर बैठकीत आ. विटेकर यांनी सांगितले. रिकामे असलेले ट्रॅक्टर पकडायचे, खोटे आरोप लावायचे आणि सोडण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागायची हे सर्व विचारांच्या पलीकडचे आहे. ही पहिली बैठक आहे म्हणून फक्त सूचना करत आहे. यापुढे थेट मंत्रालय पर्यंत तक्रारी करायची वेळ माझ्यावर आणु नका अशी स्पष्ट तंबी आ विटेकर यांनी यावेळी दिली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार माचेवड, राजपुरे, कवराखे यांच्यासह जवळपास ७९ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.