शिर्डी : प्रतिनिधी
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याच्या षडयंत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे.
शनिवारपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच हे अधिवेशन भरवले आहे. पहिल्या दिवशी धनंजय मुंडे या अधिवेशनाला गैरहजर होते. आज दुस-या दिवशी त्यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधी आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावर मोठे भाष्य केले आहे.
पहाटेचा शपथविधी घेण्यापूर्वी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरू होते, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे. पहाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये, अशी मी हात जोडून विनंती केली होती.
पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवाय या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहाटेच्या शपथविधी वेळी मी अजित पवारांना सांगत होतो, तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका, हे मोठं षडयंत्र आहे. तुमच्या पाया पडतो पण तुम्ही जाऊ नका, असं मी दादांना म्हणालो होतो. पण दादांनी माझं ऐकलं नाही. काहीही होणार नाही, असं म्हणत ते शपथविधीला गेले. याला सुनील तटकरे स्वत: साक्षीदार आहेत. तेव्हापासून दादांना पक्षातून बाजूला करण्यासाठी षडयंत्र सुरू होतं, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मैं आईना हूँ
दरम्यान, मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केले. सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही मुंडेंनी यावेळी केली. शिवाय ‘मैं आईना हूँ, मैं आईना दिखाऊंगा’, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.