मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणा-या आरोपीला आज अटक करण्यात आली. या आरोपीला आज दुपारी बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले. या आरोपीला पोलिसांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असून हिंदू नाव घेऊन वावरत होता असे समोर आले आहे.
खार पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद(३०) याची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतू कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. शहजाद हा ठाण्याच्या हिरानंदानी भागात राहत होता. शहजादच्या वकिलांनी तो बांगलादेशी नसून तो भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. तर सरकारी वकिलांनी तो बांगलादेशी असून तो कोणत्या उद्देशाने भारतात घुसलेला याची चौकशी करायची असल्याचे म्हटले आहे.
हल्लेखोर बांगलादेशी असल्याचे समजताच भाजपाने राज्यात अनधिकृतरित्या राहणा-या बांगलादेशी नागरिकांना पकडण्याची मागणी केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे. बॉलिवूड अभिनेता सैफअली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर ७२ तासाने आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ठाण्याच्या कासारावडली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे हाती लागले नसून तो बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.