पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरातील न-हे भागात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. रेश्मा भिकू खुडे (वय ३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, कोल्हापूर) याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रेश्मा यांचा पहिला विवाह झाला होता. पतीसोबत पटत नसल्याने त्यांनी आरोपी कुमारशी दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुले होती. महिनाभरापूर्वी त्या कुमार याच्यासोबत न-हे भागात राहायला आल्या होत्या. कुमार रेश्मा यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते.
शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरून घरी आला. त्याने पुन्हा रेश्माशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने रेश्मा यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पती कुमारला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.