गाझापट्टीत सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी इस्रायल आणि हमासदरम्यान टप्प्याटप्प्याने करार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला मान्यता दिली आहे. अब्राहम कराराचा विस्तार करण्यासाठी या कराराचा उपयोग करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अब्राहम करार झाला होता. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करार होताच गाझातील लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी आनंद साजरा केला. इस्रायलच्या मंत्रिमंडळाने शनिवारी गाझात बहुप्रतीक्षित शस्त्रसंधी लागू करण्याच्या कराराला मंजुरी दिली. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासमधील शस्त्रसंधीचा हा करार रविवारी सकाळपासून लागू झाला.
त्यामुळे दीड वर्षापासून संघर्षाच्या आगीत धगधगत असलेल्या गाझा पट्टीतील युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. तीन टप्प्यांतील या करारानुसार पहिल्या टप्प्यात हमासकडून ३३ ओलिसांची तर इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार आहे. इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या कतार, ईजिप्त आणि अमेरिकेने बुधवारी कराराची घोषणा केली होती. परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यास हिरवा कंदिल न दाखवल्याने कराराबाबत संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच इस्रायलकडून हवाई हल्ले सुरू राहिल्याने शस्त्रसंधीचा करार अधांतरी लटकला होता. अखेर इस्रायलच्या मंत्रिमंडळाने २४ विरुद्ध ८ मतांनी करार मंजूर केला. इस्रायल-हमासमधील शस्त्रसंधी तीन टप्प्यांत लागू होणार आहे. १९ जानेवारी ते १ मार्च दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात गाझात युद्ध पूर्णपणे थांबलेले असेल. हमास व इस्रायलकडून या काळात ठरल्याप्रमाणे ओलीस व कैद्यांची देवाण-घेवाण होईल. पहिल्या टप्प्यात ३ जानेवारीपर्यंत सर्व काही ठीक चालले तर दुस-या टप्प्यातील योजनेवर चर्चा सुरू होईल.
या काळात एकमेकांवर हल्ले केले जाणार नाहीत. तसेच जिवंत असलेल्या काही बंधकांची हमास सुटका करेल. इस्रायलकडूनही काही कैद्यांची सुटका केली जाईल. तिस-या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात हमास ३३ ओलिसांची सुटका करणार आहे. इस्रायलचे सैन्य गाझा सीमारेषेपासून ७०० मीटर पाठीमागे हटणार आहे. ओलिसांच्या बदल्यात इस्रायलकडून ७०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर व्यापक हल्ला करत युद्धाला तोंड फोडले होते. हमासच्या हल्ल्यात १२००जण ठार झाले होते. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४६ हजारहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले असून शेकडो जखमी झाले आहेत. लाखो लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. युद्धात आतापर्यंत २३ लाख लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीतील सुमारे ९० टक्के लोक बेघर झाले आहेत. या करारामुळे पश्चिम आशियातील तणाव आणि इस्रायल-इराणमधील युद्धाची शक्यता कमी होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी हमासला युद्धविराम कराराला अंतिम स्वरूप देण्याचा आणि शपथ घेण्यापूर्वी इस्रायल ओलीस सोडण्याचा इशारा दिला होता. तसे न झाल्यास हमासने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे म्हटले होते. कराराच्या अंमलबजावणीनंतरही दोन्ही बाजूंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. इस्रायलला सुरक्षेची हमी हवी असेल तर गाझामधील पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागेल. इस्रायलने गाझाच्या कारभारात हमासचा कोणताही सहभाग मान्य करण्यास नकार दिल्याने युद्धानंतर गाझावर कोण राज्य करेल हा अनुत्तरित प्रश्न आहे. या करारामुळे इस्रायली जनतेचा पंतप्रधान नेतन्याहू यांच्याबद्दलचा राग कमी होईल. कारण ओलिसांची सुटका करण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव होता. याशिवाय इस्रायलवर मित्रदेश अमेरिकेसह मोठा आंतरराष्ट्रीय दबाव होता. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने इस्रायलच्या कृतीला नरसंहार घोषित केले होते आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने नेतन्याहूविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमावर्ती भागावर हल्ला करून सुमारे १२०० सैनिक आणि नागरिक मारले होते.
तसेच अडीचशेहून अधिक परदेशी आणि इस्रायलींचे अपहरण केले होते. त्यापैकी शंभरहून अधिक ओलिसांना गत आठवड्यात तात्पुरत्या युद्धविरामात सोडले होते. युद्धविराम करार जाहीर झाल्यापासून इस्रायली हवाई हल्ल्यात किमान ७० लोक ठार झाले आहेत असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोणाच्याही प्रयत्नांनी किंवा दबावाखाली का होईना पण युद्धविराम होऊन हमासच्या ताब्यातील ओलिसांची व इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होणार. विस्थापितांना त्यांच्या हक्काच्या जागी परतता येणार ही चांगली गोष्ट आहे. परंतु युद्धविराम टिकवण्यात अनेक आव्हाने आहेत. वर्षानुवर्षांचा परस्पर अविश्वास त्याला कारणीभूत आहे. कट्टर गटांचा इस्रायल सरकारवरील दबाव हा आणखी एक घटक आहे. हमासच्या नेतृत्वाला स्वत:ची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांमधील प्रतिमा राखावी लागेल. विविध कारणांस्तव मध्य-पूर्व आशियातील कोणत्याही संघर्षात रस घेणा-या बा घटकांच्या प्रभावामुळेही युद्धविरामाला नख लागू शकते.
युद्धविराम प्रदीर्घ काळ टिकवायचा असल्यास त्यात आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. गाझाची पुनर्बांधणी आणि शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन या दोन बाबी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. गाझात वीज, पाणी आणि आरोग्य या प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इस्रायल आणि हमाससह पॅलेस्टाईनमधील सर्व घटकांदरम्यान शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. दहशतवादाच्या मार्गाने इस्रायलला झुकवणे शक्य नसल्याची वस्तुस्थिती हमासने मान्य करणे गरजेचे आहे, नसता युद्धविराम केवळ एक अल्पकालीन विराम ठरेल.