मुंबई : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्याच्या कर्मचा-यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून यंदा कर्मचा-यांना ६ ते ८ टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे. ही वेतनवाढ जानेवारी आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. या आधी नोव्हेंबर २०२३ मध्ये कर्मचा-यांना वेतनवाढ देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी कर्मचा-यांना आठवड्यात ७२ तास काम करण्याचा सल्ला दिला होता.
इन्फोसिस कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित चांगली महसूल वाढ नोंदवली होती. कंपनीने या काळात ११ टक्क्यांची वाढ नोंदवली असून ६,८०६ कोटी रुपयांचा घसघशीत महसूल कमवला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्यात तिमाहित हा फायदा ६,१०६ कोटी रुपये इतका होता. भारतीय कर्मचा-यांच्या तुलनेत परदेशात काम करणा-या कर्मचा-यांना कमी प्रमाणात वेतन वाढ होणार आहे. पण चांगली कामगिरी करणा-या कर्मचा-याला चांगले वेतन वाढ होणार असल्याची माहिती इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी सांगितले.
१ जानेवारीपासून वेतनात वाढ
इन्फोसिसने जाहीर केलेली वेतनवाढ ही दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून जॉब लेव्हल ५ च्या कर्मचा-यांना वेतनवाढ लागू करण्यात येणार असून ती फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. तर दुस-या टप्प्यात जॉब लेव्हल ६ च्या कर्मचा-यांना, मार्चपासून वेतनवाढ लागू करण्यात येणर असून ती एप्रिलमध्ये मिळणार आहे. जॉब लेव्हल ५ मध्ये इंजिनिअर, सिनिअर इंजिनिअर, सिस्टिम इंजिनिअर, कन्सलटंट यांचा समावेश होतो. तर जॉब लेव्हल ६ मध्ये मॅनेंजर, सिनिअर मॅनेंजर, डिलिव्हरी मॅनेंजर आणि सिनिअर डिलिव्हरी मॅनेंजर यांचा समावेश होतो.