मुंबई : प्रतिनिधी
क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणा-या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून आज वानखेडे स्टेडियममध्ये भव्यदिव्य असा कार्यक्रम पार पडला. यामध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणा-या मुंबईच्या कर्णधारांचा विशेषत्वाने सन्मान करण्यात आला. यावेळी लेझर शो, अजय-अतुलच्या गाण्याचा कार्यक्रमही पार पडला. या रंगारंग सोहळ््याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांसह निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुंबई क्रिकेट संघातील क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली. तसेच शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार, रोहित पवार आदींनीही हजेरी लावली. याचबरोबर अजय-अतुल आणि अवधुत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रमही पार पडला. तसेच लेझर शोदेखील पार पडला. ज्यावेळी सचिन व्यासपीठावर दाखल झाला, तेव्हा उपस्थितांनी सचिन…सचिन… अशी घोषणाबाजी केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे सचिनच्या नावाने जयघोष सुरू झाला, तेव्हा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाची आठवण सर्वांना झाली.
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर खेळाडूंनी संपूर्ण वानखेडेवर फेरी मारत चाहत्यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थितांनी जल्लोष केला. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला. यासोबतच मुंबईचे खेळाडू जे भारताचे कर्णधार राहिले आहेत, त्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती खेळाडूंना देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी यांचा सन्मान करण्यात आला.
वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमात यंदा पाकिस्तानात होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा करंडक आणण्यात आला. या करंडकाबरोबर स्टेजवर उपस्थित भारताच्या दिग्गजांनी फोटोही काढला. याचबरोबर रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि सर्व भारतीयांचा पाठिंबा असेल, असे सांगितले.
वानखेडेचा स्वतंत्र स्टॅम्प
वानखेडे स्टेडियमच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त वानखेडेचा एक स्वतंत्र स्टॅम्प सादर करण्यात आला. यावेळी कॉपीटेबल बुकचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि वानखेडेच्या योगदानाची सचित्र माहिती देण्यात आली.
गावस्करांचा वाढदिवस
वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्करांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. सुनील गावस्करांना येत्या १० जुलै रोजी ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. २०२५ सुरू होताच त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले. केक कापून आणि बॉलीवूड गायक शेखर रावजियानी याच्या गाण्यासह त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.