इस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताची चर्चा रंगली असताना त्यांच्या काही समर्थकांनाही हा प्रवेश व्हावा, असे वाटत असल्याचे दिसून येते. जयंत पाटील यांनी काही विश्वासू निकटवर्तीयांशी याबाबत चर्चा केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आता जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.
चर्चांच्या वादळात जयंत पाटील यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही. भाजपमधून एक मंत्रिपद सांगलीसाठीच राखून ठेवल्याचे भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्टही केले. येथील पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडेच येईल, असा तर्कही राजकीय वर्तुळात लावला जात आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इस्लामपूर मतदारसंघातील भाजपच्या काही नेत्यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका राज्यमंर्त्याने जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. तरीही भाजप प्रवेशासंदर्भात जयंत पाटील यांनी निकटवर्तीयांशी चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.
कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बाबुजी पाटणकर यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. यावेळी पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, खासदार विशाल पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, डॉ. कॉ. संपत देसाई यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत. परंतु जयंत पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने कासेगाव पंचक्रोशीत यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. गतवर्षीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. याची आठवणही सर्वसामान्य नागरिक करून देत आहेत. त्यामुळेच सध्यातरी जयंतराव द्विधा मनस्थितीत असले तरी त्यांचेच समर्थक त्यांच्या भाजप प्रवेशाची इच्छा बाळगून असल्याचे दिसत आहे.