कोलकाता : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची बलात्कारातून हत्या झाल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला शनिवारी कोर्टाने दोषी ठरविले होते. यावेळी संजय रॉय याने कोर्टासमोर आपल्याला अडकवले जात असल्याचा दावा केला होता. त्याने जजसमोर आपण दोषी नाही. आपल्याला फसवले जात आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असा बचाव केला होता. परंतू सीबीआयने या प्रकरणात कोर्टासमोर संजय रॉय याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर विशेष न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
त्याचबरोबर, न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला मृतांच्या कुटुंबाला १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. निकाल देताना हा किरकोळ गुन्हा नसला तरी त्याला दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा देखील म्हणता येणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोलकाता आरजी हॉस्पिटल महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात कोलकाताच्या सियालदह कोर्टाने सुमारे १६२ दिवसानंतर शनिवार १८ जानेवारी रोजी आपला निकाल देत आरोपी संजय रॉय याला दोषी ठरविले होते. आज अखेर आरोपी मेडिकल स्वयंसेवक संजय रॉय याला विशेष कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाच महिन्यानंतर कोर्टाने आरोपीला दोषी ठरवित आपला निकाल जाहीर केला आहे.
दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही
हा गुन्हा साधारण गुन्हा नसला तरी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा गुन्हा दुर्मिळात दुर्मिळ गुन्हा देखील नसल्याचे न्यायालयाने निकाल देताना विशेष न्यायालयाने म्हटले आहे. सियालदाहच्या विशेष न्यायालयाने शनिवारी, १८ जानेवारी रोजी संजय रॉय याला दोषी ठरविले होते. शिक्षेच्या घोषणेपूर्वीच्या सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉय यांनी न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडली होती. त्याने न्यायाधीशांना सांगितले की आपण निर्दोष आहोत. मला या प्रकरणात अडकवले जात आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असा दावा संजय रॉय याने आपली बाजू मांडताना केला होता.
संपूर्ण देशभरात खळबळ
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एका महिला ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करण्यात येऊन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पाच महिन्यात आरोपपत्र दाखल होऊन मुख्य आरोपीला संजय रॉय या वैद्यकीय स्वयंसेवकाला अटक झाली होती. या प्रकरणात बीएनएस धारा ६४,६६, १०३/१ च्या कलमांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.
नेमके काय घडले होते?
९ ऑगस्ट २०२४ रोजी आरजी कर मेडिकल कॉलेजच्या छाती विकारतज्ज्ञ विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमाच्या खुणा होत्या. दुस-या दिवशी हॉस्पिटलचा स्वयंसेवक संजय रॉय याला या प्रकरणात अटक झाली होती .१३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास काढून सीबीआयच्या ताब्यात सोपविण्याचा आदेश कोलकाता हायकोर्टाने दिला होता. सीबीआयने १४ ऑगस्टपासून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. आरजी कर हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले ४ डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियर सह इतर ६ लोकांची सीबीआयच्या मुख्यालयात पॉलीग्राफ सत्य शोधन टेस्ट करण्यात आली होती. सोमवारी या प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.